Newsworldmarathi Pune : इतिहास विसरलो तर वर्तमान परिस्थितीशी लढायला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे इतिहास विसरू नका. तो समजून घ्या. आंबेडकरी चळवळीत आपण किती टप्पे गाठले याची जाणीव नसल्याने अनेकदा आपलेच लोक त्या चक्रात अडकतात. पण आपल्याला इतिहास माहिती असेल तर वर्तमान परिस्थिती निर्भिडपणे लढता येते, ती लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आंबेडकरी चळवळीच्या कालखंडातील महत्त्वाच्या टप्प्यांचा दस्तऐवज असलेले “सम्यक ते वंचित : चळवळीचा दस्ताऐवज” या शांताराम पंदेरे यांनी संकलित केलेल्या ग्रंथाचे पुण्यातील निळू फुले सभागृहात प्रकाशन झाले. याप्रसंगी ॲड. आंबेडकर बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांनी 1977 नंतरच्या राजकीय घडामोडी, रशियाच्या उदाहरणाने दाखवलेली दूरदृष्टी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील सरकारी लाठीमार आणि जनतेमध्ये पसरवलेली दहशत यावर सखोल विवेचन केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, मी लोकांमध्ये बसून चर्चा केल्या, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नाशिक ते मुंबई लॉंग मार्चचा निर्णय झाला आणि त्यातून लोकांचा चळवळीवरचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला. चळवळीत नेमकं काय साधायचं आहे, हे लक्षात ठेवा. टीकाकारांना घाबरण्याचे कारण नाही. निर्भिडपणे आपले मत मदत रहा. वाचन करून समजून घेणे, निर्णयक्षम होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टीव्हीवर जे दिसते आणि वर्तमानपत्रात जे छापून येते ते तपासून घ्या. लगेच खरे मानू नका, विचार करा, तपासा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. वि. पवार, शांताराम पंदेरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, प्रा. संजीव चांदोरकर, ॲड. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, देवेंद्र उबाळे, पुष्पाताई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments