Newsworldmarathi Pune : मी अमेरिका दौऱ्यावर गेलो असताना मी बघितलं की तेथील समस्यांमध्ये “एकाकी ज्येष्ठ आणि वैफल्यग्रस्त तरुण” ही समस्या फार मोठी आहे. तेव्हाच ठरविले की आपल्या कडे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ आनंदाने, सुखाने व्यतीत करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी असेही खर्डेकर म्हणाले.आयुष्यभर कष्ट करून जे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात त्यांना आनंदाने आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
याच भूमिकेला अनुसरून आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त वस्तू भेट देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,डहाणूकर कॉलनी हैप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह डॉ.शिरीष अमृतकर,सह कार्यवाह,राजेश टेंबे,खजिनदार शांताराम वाणी, सहकार्यवाह दत्तात्रय घाटे, उपाध्यक्ष सीमा माळवकर, सह खजिनदार चंद्रकांत टिकेकर,शैलाताई सातपुते,हरिभाऊ नेरकर इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला वॉटर कुलर डिस्पेन्सर भेट देण्यात आले.
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात आणि सर्व सभासद एकोप्याने संघात पडेल ते काम करतात असे संघाचे कार्यवाह डॉ. शिरीष अमृतकर म्हणाले. आमच्या संघाला इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर तर्फे कै.बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ 2024 हा पुरस्कार देण्यात आला असेही डॉ. अमृतकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर व श्री. जयंत उमराणिकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आमचा उत्साह दुणावला असून आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू असेही संघाच्या सदस्यांनी एकमुखाने जाहीर केले.आमच्या यशात संघाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह यांचा मोठा सहभाग असल्याने नुकतेच त्यांचेही सत्कार करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन उत्तम सामाजिक काम करत असून आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगून संघातर्फे संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले. यापुढे क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रूप, मुकुलमाधव फाउंडेशन, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने अधिकाधिक सेवाकार्य करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.


Recent Comments