Newsworldmarathi Pune: कै. सुनिल भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे आणि रेड स्वस्तिक सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत महाआरोग्य व रोगनिदान महाशिबिराचा दोन हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात तपासणी केलेल्या 85 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ब्रेस्ट कॅन्सर निदान झालेल्या महिलांवरही मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
शिवाजी नगर मेट्रो स्टेशन समोरील मोकळ्या जागेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 165 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. रक्तदान करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. डोळ्यांची तपासणी करून 700 गरजूंना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. 215 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली असून यातील 40 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मणका (स्पाईन), मेंदू, कॅन्सर, स्त्रीरोग आणि अर्धांगवायू या सारख्या आजारांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत सल्ला व प्राथमिक उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डॉ. संजय तरलेकर, डॉ. स्मिता वाबळे, डॉ. गुरुतेजसिंग ब्रार (कॅनडा), आणि डॉ. सुनील साबळे यांनी रुग्णांची तपासणी केली.
सीआयडीचे डीआयजी सारंग आव्हाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक सनी निम्हण, बाळासाहेब बोडके, उदय महाले, प्राचार्य वाल्हेर, प्रसाद भिमाले, तिरुपती भंडारी आदींनी शिबिरास भेट देऊन समाजभिमुख कार्याचे कौतुक केले.
या आरोग्य शिबिरामुळे शेकडो गरजू नागरिकांना मोफत औषध वाटप करून आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या. या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आल्याचे चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मारुती भंडारी, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे यांनी सांगितले.


Recent Comments