Newsworldmarathi Pune : द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिनांक २१ व २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती हेतल शहा आणि दीपाली जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे उपस्थित होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी होणार असून, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे असणार आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृतींनी सजलेले हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Recent Comments