Newsworldmarathi Nagar : शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
हा प्रकार १० एप्रिल रोजी सायंकाळी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी, तसेच १८ एप्रिल सायंकाळी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे याने एका विद्यार्थिनीला वारंवार फोन करून कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावले. वर्गातील एकत्र बसलेला फोटो मोबाईलमध्ये दाखवून तो एचओडीला दाखवण्याची धमकी देत विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले. त्यानंतर त्याने तिचा हात हातात धरला आणि तुला यातून बाहेर काढीन असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव टाकला.
या वर्तनामुळे विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न झाल्याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. दरम्यान, ११ एप्रिल रोजी सायंकाळी आणखी एका विद्यार्थिनीवरही अशाच प्रकारे संशयित आरोपीने गोदामामध्ये विनयभंग केला. तिचा हात पकडला व तिलाही लज्जास्पद वागणूक दिली. दरम्यान, फिर्याद दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीला पोलिस कोठडी
आरोपी शिक्षक अमित खरडे याला कोतवाली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Recent Comments