Newsworldmarathi Pune : आधीच वाहनांच्या गर्दीने त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी आणखी एक अडथळा निर्माण होणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या पूलाशेजारील मेट्रो स्टेशनचे (डेक्कन जिमखाना) पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने “काम सुरु आहे, क्षमस्व” अशी माहिती देणारी पाटीही लावली आहे.
वाहतुकीवर होणार मोठा परिणाम
बाबा भिडे पूल हा डेक्कन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवारवाडा परिसरात जाण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे यामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड या भागात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांसमोर मोठं आव्हान
वाहतूक पोलिसांसाठी या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, आणि वेळ वाचवण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधीपासूनच विचार करावा, असं आवाहन करण्यात येत आहे..
नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम
नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. तर दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आता त्याचा परिणाम नदीपात्रातील वाहतुकीवर सुद्धा होणार आहे.


Recent Comments