Newsworld Pune : मराठीच्या अभ्यासक-संशोधक स्वाती सुहास कर्वे (वय ७२) यांचे दीर्घकालीन आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चिंचवड येथील फत्तेचंद विद्यालयात व पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले होते.
स्वाती कर्वे यांनी ललित, वैचारिक, समीक्षा व संशोधनात्मक लेखन केले असून ‘दशावतार’, ‘भारतीय सण व उत्सव’, ‘चिरंजीव’, ‘पंचकन्या’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप’, ‘आठवणीतील पुस्तके’, ‘दळवींची नाटकेः एक अंतर्वेध’, ‘स्त्रियांच्या परिषदांचा इतिहास’ (१८५० ते २०१०) ही समीक्षात्मक पुस्तकेही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘स्त्री विकासाच्या पाऊलखुणा’ (१९५० ते २००७), ‘स्त्री विकासाचे नवे क्षितिज’ (१९५० ते २००७) हे स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे दोन खंड त्यांनी संपादित केले होते. ‘स्त्रियांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक मूल्यमापन’ या प्रकल्पाला महाराष्ट्र फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अभ्यासू संशोधक व समीक्षक म्हणून त्या साहित्य वर्तुळात परिचित होत्या.
कर्वे यांच्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, ना.ह. आपटे पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाले होते.