Newsworldmarathi Daund: दौंड तालुक्यातील सहजपूर येथील माकरवस्ती भागात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कालव्यात खेळताना उडी मारल्याने तीन वर्षीय चिमुकला आसिम जावेद मुजावर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेक जावेद मुजावर (वय ७) आणि रूहान जावेद मुजावर (वय ५) ही त्याची दोन भावंडं मात्र सुदैवाने बचावली.
तीनही मुले कालव्याच्या कडेला खेळत असताना त्यांनी अचानक पाण्यात उड्या घेतल्या. ही घटना शेजारील एका महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकताच निलेश खोमणे यांनी धाव घेत दोघा चिमुकल्यांना बाहेर काढले. परंतु आसिम याला पाण्यातून बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रयत्न करून आसिमला पाण्यातून बाहेर काढले आणि जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
महेक आणि रूहान यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. या प्रसंगी निलेश खोमणे यांनी दाखवलेली तत्परता व धाडसामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले. स्थानिक नागरिक त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत.
या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये आणि परिसरातील लोकांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण झाली असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित झाली आहे.


Recent Comments