Newsworldmarathi Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी केलेल्या दुचाकीच्या वादातून कुख्यात गुन्हेगाराने सतरा वर्षांच्या मुलासह त्याच्या मेहुण्याची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बायजीपुरा भागातील गंजे शाहिदा मशिदीमागे शनिवारी (दि. १९) घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. शेख आसिफ शेख हाफीज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इम्रान खान आरेफ खान याने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शनिवारी सकाळी चंपा चौकात उभा होता. तेव्हा त्याचा चुलत भाऊ मुज्जू खानने इम्रानला सांगितले की, तुझा भाऊ सलमान खान आरेफ खान व त्याचा मेहुणा सुलतान शेख इसा यांना तुझ्या काकाच्या घरासमोर कोणीतरी मारले असून, ते मृत झाले आहेत. हे ऐकताच इम्रानने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
खुनाच्या घटनेपूर्वी सलमानचा चुलत भाऊ जुबेरला रात्री १२.३० वाजता आरोपी शेख आसिफचा कॉल आला होता. तेव्हा घाबरलेल्या जुबेरने त्याला आपण बुलढाणा येथे असल्याचे सांगितले. आसिफने फोनवर सुलतानबद्दल विचारणा केली होती. आपली दुचाकी सुलतान परत देत नाही. ती पोलिसांनी पकडली असून, त्यावरून पोलीस माझा शोध घेत आहेत.
त्यामुळे सुलतानला आपण सोडणार नसल्याची धमकीही आसिफने दिली होती. या कॉलनंतर आसिफ हा सुलतानचा शोध घेत गंजे शाहिदा मशिदीच्या मागे आला. शनिवारी पहाटे त्यांच्यात वाद झाल्यानंतर सलमान व सुलतानवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


Recent Comments