Newsworldmarathi Pune : समाजात प्रचंड असंवेदनशीलता, क्रूरता, हेवेदावे, माणूसकीचा अंत आणि अस्वस्थता माजवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नये असे वाटत असेल तर बालवायताच संवेदनशीलता हे मूल्य प्रत्येक शाळेत रुजवले गेले पाहिजे. माणूस म्हणून जगताना माणूसकीचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला समजला गेला पाहिजे तरच समाज सुखी आणि समृद्ध होईल असे प्रतिपादन शिवाजी खांडेकर यांनी केले.
नुकतेच राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत ” संवेदना निधी प्रदान समारंभ” पार पडला.त्या प्रसंगी ते बोलत होते.

मन समृद्ध माणसं समाज समृद्ध करतात, आदर्श मूल्य संस्कार हेच सामाजिक भान निर्माण करतात या उद्देशाने साने गुरूजी प्राथमिक शाळेत मधूकरराव निरफराके सहज शिक्षण प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी सर्व समाजाला दिशादर्शक ठरावा असा हा संवेदना निधी उपक्रम नूकताच संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी संवेदनशीलता मूल्यावर अधारित एक कथा सांगितली जाते व दर शनिवारी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रुपया आणण्याचे आवाहन केले जाते. वर्षभर हा निधी संवेदना निधी डब्यात टाकला जातो. जमा झालेला हा निधी दरवर्षी अंध, अपंग,वृद्धाश्रम अशा समाजातील दुर्लक्षित संस्थेला प्रदान करण्यात येतो.संवेदनशिलतेबरोबरच अशा दुर्लक्षित व्यक्तिंविषयी आपूलकी निर्माण व्हावी व आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या वर्षी हा निधी नर्हे येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या आश्रमास प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख अर्जून केंद्रे यांनी तो कृतज्ञतेने स्वीकारला.
सोबत शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी “एक मूठ तांदूळ एक मूठ साखर” हा उपक्रम राबवत साधारण ५० -५० किलो तांदूळ व साखरही या संस्थेकडे सुपूर्द केली. यात इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटीनमच्या कोषाध्यक्षा माधूरी बोरा, अध्यक्षा प्रिती शिरुडकर, चिटणीस वृषाली शिरूडकर, सदस्या संगिता गोवळकर यांचाही वाटा मोठा होता.
यावेळी व्यासपीठावर प्रशासक मंडळाचे सचिव मा शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापक मीना काटे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, तेजस्विनी फूलफगर, विठ्ठल शेवते,शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक मुख्याध्यापक मीना काटे यांनीकेले.सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले तर आभार संगिता गोवळकर यांनी मानले.


Recent Comments