Newsworldmarathi Pune : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे जमिनीच्या वादातून तसेच चुलता आणि चुलतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निखिल अजय मिंडे (वय २८) असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी मांदळेवाडी येथे उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रोहित अजय मिंडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत निखिलचा चुलता संजय नारायण मिंडे व चुलती कुंदा संजय मिंडे (दोघे रा. कौलीमळा थोरांदळे, पाटीलमळा रोड, ता. आंबेगाव) यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित अजय मिंडे, निखिल मिंडे व त्याचे कुटुंबीय थोरांदळे येथे राहत आहेत. फिर्यादी रोहित यांचा चुलता संजय नारायण मिंडे यांच्यात शेतजमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होते. त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल असून, तो न्यायप्रविष्ट आहे.
रविवारी (दि. २०) फिर्यादी रोहित आणि निखिल तसेच चुलता संजय, चुलती कुंदा यांच्यात जमिनीच्या वादातून भांडण झाले होते. चुलता संजय याने फिर्यादी रोहित व निखिल यांच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतरसुद्धा चुलता व चुलतीने फिर्यादी रोहित आणि निखिल यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे फिर्यादी आणि त्याचा भाऊ निखिल मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच निखिलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.
Recent Comments