Newsworldmarathi Sangali: मिरज तालुक्यातील बेडग येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण करून शेतातील झोपडी पडली. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय 24, रा. बेडग) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ओमासे व राहुल ओमासे यांच्यात बेडग येथील दीड एकर शेतजमिनीच्या मालकीवरून वाद आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करत २२ एप्रिल रोजी जितेंद्र ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण राहुल ओमासे यांच्या शेतात गेले.
जमीन ताब्यात घेण्यासाठ राहुल यांना झोपडीतून घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडली. राहुल यांचे वडील सुरेश यांना मारहाण केली व त्यांच्या आईला शिवीगाळ केली, असं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ओमासे यांच्यासह चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक केली नसून अधिक तपास सुरु आहेत.


Recent Comments