Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव-खराडी परिसराला जोडणाऱ्या केवळ ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी आमदार बापू पठारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी ८.३० वाजता त्यांनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांसह या रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनाला सुरुवात केली. फॉरेस्ट पार्क आणि गोठण ओढा मार्गे जाणारा हा रस्ता लोहगाव-वाघोली मार्गाला जोडतो. मात्र, अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असून, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज अपुऱ्या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पठारे यांनी केला आहे. विभागाचे अधिकारी ‘बघू, करू’ असे उत्तर देतात, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे पठारे यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
पठारेंच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं आहे?
लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Recent Comments