Newsworldmarathi Pune: श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे गुरुवार, १९ जून रोजी प्रस्थान होणार आहे. यंदा तिथीचा क्षय झाल्याने सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोहळा एकच दिवस मुक्कामी राहणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे १९३ वे वर्ष आहे.
माऊलींचे निस्सीम भक्त गुरू हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्यावेळी त्यांना श्रीमंत शितोळे सरकार, वासकर, आळंदीकर, देहूकर आदी वारकरी मंडळींनी साथ दिली. पूर्वी हा सोहळा आळंदी, पुणे, शिरवळ मार्गे लोणंद येथे होता व तेथून तो फलटण, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला जात होता.
पुढे वेळापूरला मानाचे भारुड वाल्ह्याचे कृष्णाजी मांडके यांनी नीरा नदीवर दगडी पूल बांधून दिल्याने सोहळा सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरामार्गे लोणंदला येऊ लागला. यंदा माऊलींच्या सोहळ्याचा २० व २१ जून रोजी पुण्यात, २२ व २३ जून रोजी सासवड, २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जूनला निरा स्नानानंतर सातारा जिल्हा प्रवेश व लोणंद मुक्कामी सोहळा राहील.
२७ जूनला चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होईल व सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचेल. २८ जूनला फलटण, २९ जूनला बरड, ३० जूनला धर्मपुरी येथे सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होईल व सोहळा नातेपुते मुक्कामी पोहोचेल. १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, ३ जुलै भंडीशेगाव, ४ जुलै वाखरी, तर ५ जुलैला सोहळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. ६ जुलैला पंढरपूर येथे आषाढीचा सोहळा पार पडेल. १० जुलैला पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल व २० जुलैला सोहळा आळंदीत पोहोचेल.


Recent Comments