Newsworldmarathi Pune : भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे.
पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार, वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्षपदासाठी फायनल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा होऊन या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यासाठी काही दिवसांपूर्वी परिवेक्षकांचीही नियुक्ती केली होती.
गणेश बिडकर: पुण्यातील भाजपचे प्रभावशाली नेते
गणेश बिडकर हे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक प्रभावशाली आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर काम केले असून, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बिडकर यांनी सभागृह नेते म्हणून कार्यरत असताना स्थानिक विकास प्रकल्पांवर भर दिला आहे. ज्यामुळे त्यांना जनतेमध्ये चांगली ओळख मिळाली आहे.
सध्या पुणे शहराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये बिडकर यांचे नाव आघाडीवर असून, पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार वरिष्ठांकडून त्यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहेत.


Recent Comments