Newsworldmarathi Mumbai : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ २१०० रुपये देण्यास तिजोरीत पैसेच नाहीत. अर्थखात्यात शकुनी महाभाग बसल्याची जोरदार टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. या टीकेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाल्याने टीका करण्यापेक्षा शिरसाट यांनी अभ्यास करायला हवा, असा टोला लगावला. त्यामुळे सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरून जुंपल्याचे चित्र आहे.
राज्यात महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली. दोन लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी २१०० रुपये महिलांना देणार असल्याची घोषणा केली. मात्र निवडणुकीनंतर छाननी सुरू केली. त्यामुळे ही योजना चांगलीच वादात सापडली. विरोधकांनी यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भविष्यात योजना बंद होईल, असा दावा केला होता. आता सरकारने सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी आणि आदिवासी विभागाचे ३३५ कोटी असे सुमारे ७४५ कोटी योजनेसाठी दिले. महायुतीत यावरून वाद रंगला आहे.
राज्याची आर्थिक कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पण १५०० चे २१०० करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, असं विधान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे.
संजय शिरसाटांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे . मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत. फक्त ते नव्यानं मंत्री झालेले आहेत. ही गोष्ट जेव्हा घडली असं त्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यायला हवी होती. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं अतिशय अयोग्य आहे. अजितदादा हे काही आकाशातून पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काही अजितदादांनी घरी नेलेले नाहीत. दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होतेय हे साहजिक आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
Recent Comments