Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत युतीची तसेच दोन्ही पक्षांतील जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे भाजपचे निवडणूक पोस्ट प्रमुख गणेश बिडकर यांनी सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतः गणेश बिडकर एकत्र दिसत आहेत. या फोटोमुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युतीला अंतिम रूप दिले गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.
गणेश बिडकर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचीही उपस्थिती आहे. उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेची पुण्याची जबाबदारी असून, राहुल शेवाळे हे मुंबईतील युतीच्या चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर पुण्यातील युतीच्या समन्वयाची जबाबदारी भाजपकडून गणेश बिडकर यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
या सर्व घडामोडींमुळे पुण्यातील भाजप–शिवसेना युतीवर मुंबईत शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
गुरुवारी दुपारी आमदार नीलम गो-हे यांची भेट घेतल्यानंतर बिडकर हे मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे आता युतीची अंतिम चर्चा ही मुंबईत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होताना दिसत आहे. युतीच्या कोणत्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार हे आता अवघ्या काही तासातच स्पष्ट होईल असे या फोटोवरून दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या चर्चेनंतर शिवसेनेची जागा वाटपाबद्दलची नाराजी देखील दूर झाली असल्याचे सांगितले जाते.


Recent Comments