मुंबई, दि. ९ : राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच नव्या पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार असून, सुमारे ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५० हजार, तर आयोगाबाहेरील जवळपास २० हजार पदांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. भरती करताना आवश्यक कौशल्ये, पात्रता, सेवा प्रवेश आणि कामाच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य प्रशासनात मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा प्रवेश नियमावलीतील सुधारणा लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाची भूमिका केवळ औपचारिक नसून, संपूर्ण भरती व्यवस्थेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, विलंब आणि गैरसोयी टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल पडताळणी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. डिजीलॉकर आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


Recent Comments