Newsworldmarathi Pune: पाकिस्तानवर केंद्र सरकारकडून सध्या जी कारवाई केली जात आहे, ती केवळ पोकळ असून ठोस कारवाईची गरज आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाकिस्तानवरील पार्श्वभूमीवर कडक कारवाईची मागणी केली जात असताना भारताकडून अमेरिकेच्या सल्लागाराच्या परवानगीची वाट पाहत आहे का? असा सवाल माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सल्लागार राहिलेल्या जेसन मिलर यांना पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारकडून लॉबिंगसाठी नेमल्याची माहिती समोर येत आहे. या नेमणुकीनुसार जेसन मिलर यांना दर महिन्याला तब्बल १ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर्स इतके मानधन देण्यात येणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला स्वतःचे परराष्ट्र खाते असताना, अशा परदेशी व्यक्तीची लॉबिंग करण्याची गरज का भासते ? भारत सरकारने याबाबत पारदर्शकता दाखवून स्पष्टीकरण द्यावे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्टपणे सांगावे की, जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारच्या वतीने झाली आहे का? आणि जर झाली असेल, तर ती कोणत्या कारणास्तव करण्यात आली? याची माहिती देशातील जनतेला देण्यात यावी, असंही आंबेडकर यांनी म्हटले.
पुढे म्हणाले, जेसन मिलर यांच्याकडून परवानगी आल्याशिवाय भारत सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का? असा गंभीर सवाल उपस्थित करत अॅड. आंबेडकर यांनी भारत सरकारकडून या प्रकरणावर त्वरित आणि विश्वासार्ह उत्तर मागितले आहे. जेसन मिलर हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Recent Comments