Newsworldmarathi pachora: पाचोरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात असलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना पाचोरा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेश प्रकाश महाजन (वय-१९, रा. एरंडोल) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल येथील भावेश महाजन या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर तो गेल्या १५ दिवसांपासून पाचोरा येथील राजीव गांधी कॉलनीत राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मे रोजी त्याची बहीण व मेव्हणे हे लग्नासाठी पुणे येथे गेले असल्यामुळे भावेश हा घरी एकटाच होता.
सोमवारी सकाळच्या सुमारास भावेश रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मेव्हण्यांच्या दुकानावर गेला. दरम्यान, ५ मे रोजी बारावीचा निकाल असल्यामुळे तो दुपारी दुकान बंद करून घरी निघाला. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये भावेशला ४२ टक्के गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला. त्यातूनच भावेशने दुपारच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments