Newsworldmarathi Pune : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे व इतर भागांतील काही निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या हानीची भरपाई कोणत्याही प्रकारे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित कुटुंबातील एका पात्र सदस्याला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे ही समाधानाची गोष्ट आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणीच करण्यात यावी अशी मागणी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून त्यांना कुटुंबाची काळजी घेता येईल आणि मानसिक आधार मिळेल. यासंदर्भात स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांचे उदाहरण देण्यात आले असून, त्या उच्चशिक्षित असून पुणे महानगरपालिकेत त्यांच्या अर्हतेनुसार नियुक्ती देता येऊ शकते, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


Recent Comments