Newsworldmarathi Delhi : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
धर्मशाळामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना जम्मू आणि पठाणकोटजवळ हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यामुळे अर्धवट थांबवण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून BCCI ने हा मोठा निर्णय घेतला.
शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर BCCI ने अधिकृतपणे IPL स्थगितीची घोषणा केली. “देश युद्धसदृश स्थितीत असताना क्रिकेट खेळणं योग्य नाही,” असं मत BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTI शी बोलताना व्यक्त केलं.
या निर्णयामुळे कोलकात्यात २५ मे रोजी होणारा अंतिम सामना आणि उर्वरित सर्व सामने सध्या अनिश्चिततेत अडकले आहेत.
IPL अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सुरुवातीला ९ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं सांगितलं होतं. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर झाल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.
धुमाळ यांनी स्पष्ट केलं की, “परिस्थिती सतत बदलते आहे. पुढील निर्णय केवळ सरकारी यंत्रणांच्या सल्ल्यानुसार आणि लॉजिस्टिक परिस्थिती विचारात घेऊनच घेतला जाईल.” IPL पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील.
Recent Comments