Newsworldmarathi Delhi : गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भारत सरकारनेही यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
मिस्री यांनी स्पष्ट केलं की, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमारेषेवर मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यांची मालिका सुरू झाली होती. सीमारेषेवर सतत गोळीबार सुरु असतानाच, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही भागांत नागरिकांना स्थलांतरही करावं लागलं. युद्धजन्य परिस्थितीने आणखी गंभीर रूप धरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्तींनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर दोन्ही देशांमध्ये शांततेचा मार्ग निवडण्यात आला आहे. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे आता सीमारेषेवर आणि दोन्ही देशांमध्ये सामान्य स्थिती परतण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Recent Comments