Newsworldmarathi Pune : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून आकाशात अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. आता हवामान विभागाने (IMD) पुन्हा नवा इशारा दिला असून, पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक आहे. या भागांतील शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे काही भागात शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान बदलामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागातही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
हवामानातील या बदलामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अचानक पावसाचे सत्र सुरू होऊ शकते. यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, गरज नसताना बाहेर पडू नये, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Recent Comments