Newsworldmarathi Nashik : अवकाळी पाऊस आणि गारपीटामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता कांद्याच्या दराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, काही बाजारांमध्ये कांद्याचा दर थेट 900 ते 1,100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा 1,000 रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. देशांतर्गत आवक वाढल्याने आणि निर्यात घटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानकडे होणारी निर्यात थांबवण्यात आली. त्याचबरोबर बांगलादेशात 30 टक्क्यांनी जास्त कांद्याचं उत्पादन झालं असून, तिकडील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातही कमी झाली आहे.
या सगळ्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारे दर घसरले असून, लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याला 1,151 रुपये, नाशिकमध्ये 900 रुपये, येवल्यात केवळ 851 रुपये, तर मनमाड व पिंपळगाव बसवंत बाजारात 1,100 रुपये दर नोंदवला गेला आहे.
सध्या नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता या संस्थांकडून सुरू होणाऱ्या खरेदीकडे लागले आहे. कांद्याची आवक अधिक असून मागणी कमी असल्याने दर घसरणे सुरूच आहे.
Recent Comments