Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खुनाची घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आली. राणी सतीश खेडकर (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सतीश भास्कर खेडकर (वय ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती सतीश खेडकर याने घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नी राणीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार केले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खेडकर याला दोन मुले असून ते सात आणि पाच वर्षांची आहेत. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे व पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मृत मुलीचे वडील सुखदेव आप्पाजी ढाकणे (रा. हसनापूर ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात सतीश भास्कर खेडकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत तालुक्यात महिलांच्या खुनांच्या दोन घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Recent Comments