Newsworldmarathi Pune: पुण्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शांतनु कुकडेच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली होते.
त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलीसांसमोर सादर केली होती.
पोलीसांनी दिपक मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments