Newsworldmarathi Mumbai : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देते. ज्या बहिणींना उद्योग सुरु करावयाचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघू उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजेतून वळता करुन घेण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चव्हाणवाडी (ता. मुखेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यातीने पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये शासनाच्यावतीने दिले जातात. या पोटी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही. दरमहा दीड हजार रुपये द्यायचेच आहेत. परंतु त्याबरोबरच जर काही बहिणींना लघु उद्योग सुरु करायची इच्छा असेल परंतु त्यांच्याकडे भांडवल नसेल आणि बँकाचे कर्ज घेण्यासाठी हमीची आवश्यकता असेल, तर लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपये महिना या रकमेची हमी देऊन ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीजबील येते ते शासनाच्यावतीने महावितरणकडे भरले जाते. त्यापोटी महिना २० हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. तो आटोक्यात आणायचा; परंतु शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सोलार पॅनेल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यापुढे लवकरच शेतकऱ्यांना हक्क व हमीची वीज उपलब्ध होईल. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
Recent Comments