Newsworldmarathi Mumbai: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित महत्त्वाचे आदेश बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे की, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना व गट-गणांची नवी रचना तातडीने सुरू करावी.
या निर्देशामुळे राज्यभरातील निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत असून, “निवडणुका कोणत्याही क्षणी लागणार?” असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.
आयोगाच्या आदेशानुसार, सरकारने सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या प्रभाग रचनेसाठी तत्काळ प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. विशेषतः महापालिका, नगर परिषद व पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता या प्रलंबित निवडणुकांची तयारी सुरू करण्यास आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
याआधी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला होता की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात. या आदेशानंतर आयोगाने हालचाल वेगवान करत निवडणुकीसाठी लागणारी प्रशासकीय तयारी सुरू करण्यास सांगितले आहे.
राज्यभरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
Recent Comments