Newsworldmarathi Shirdi : शिर्डीत सराफ व्यापाऱ्यांना सोने देण्यासाठी आलेल्या गुजरातमधील व्यापाऱ्याचे सव्वातीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून त्याचाच मोटारचालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारची (दि. १३) रात्री ते बुधवारीच्या (दि. १४) मध्यरात्रीपर्यंतच्या काळात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित (रा. चोटन बारमेर, राजस्थान) याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजयसिह वरूनानी खिली (वय ३५, रा. अहवाल घुमटी, ता. आमिर गह, जि बनासकांटा, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयसिह वरूनानी खिली हे सराफ व्यापारी सोन्याचे दागिने येथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी आपल्या अन्य सहका-यांसोबत मोटारीतून शिर्डीत आले होते. परिसरातील सराफ व्यापाऱ्यांना दागदागिन्यांचे वितरण करून, ते येथील आंबा गल्लीतील हॉटेल सुनीतामधील रूम नंबर २०१मध्ये मुकामी थांबले होते.
दरम्यान, त्यांच्या वाहनाचा चालक सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित बॅगेत ठेवलेले साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व रोख चार लाख रुपये आणि काही चेक घेऊन पसार झाला. त्यात अंदाने तीन कोटी २६ लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे विजयसिह यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपीला त्याला लक्करात लवकर जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दागिने लंपास करणारा आरोपी आपल्या वाहनावर चालक म्हणून पाच महिन्यांपासून कामाला होता, असे व्यापारी विजयसिंह यांनी सांगितले.
Recent Comments