Newsworldmarathi Pune: मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केली असल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.
मोहोळ म्हणाले, पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मनपाला दिल्या आहे.
‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे.जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मनपाने अतिक्रमण बाबत कडक कारवाई करावी. आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा देखील घेतला गेला आहे. पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महायुती म्हणून निवडणुकीची तयारी…
आगामी मनपा निवडणूक ही महायुती म्हणून लढणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुती म्हणून आम्ही लढणार असून त्यादृष्टीने निवडणुक तयारी सुरू केली आहे. गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाईल, असे देखील यावेळी मोहोळ यांनी सांगितले.
Recent Comments