Homeपुणेयेवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; स्वाभिमानी ब्रिगेडचा निषेध

येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; स्वाभिमानी ब्रिगेडचा निषेध

Newsworldmarathi Pune: शहरातील येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री आणि पिसोळी या भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या खड्ड्यांमुळे ट्रॅफिकमध्ये अडथळे निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता, स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

सुरवसे पाटील यांनी खड्ड्यांबाबत महापालिकेचे लक्ष वेधत तीव्र निषेध व्यक्त केला. “शहराचा वेगाने विस्तार होत असताना नागरी पायाभूत सुविधांची अवस्था मात्र दिवसेंदिवस ढासळत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. महापालिकेने तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी, परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाची ढिलाई नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

नागरिकांमध्येही रस्त्यांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी असून, प्रशासनाने त्वरीत उपाययोजना न केल्यास संताप वाढण्याची शक्यता आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments