Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने आदिवासी विकास विभागातील पदभरतीसाठी सरळसेवा पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्याच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रतिक्षा दुधाडे हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावत या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
१७ पदनामांच्या एकूण ६११ रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर विभागांतर्गत गृहपाल (स्त्री) पदाकरीता झालेल्या लेखी परीक्षेत प्रतिक्षाने हे यश मिळविले आहे.
हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयातून प्रतिक्षाने राज्यशास्त्र विषयात बी. ए. पदवी संपादन केली आहे. आपल्या या यशात महाविद्यालयीन पातळीवर प्राप्त झालेल्या आणि विशेषतः राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीता बोकील यांच्या मार्गदर्शनाचा विशेष वाटा असल्याचे तिने नमूद केले.
दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, सचिव श्री. हेमंत मणियार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बाब असल्याचे नमूद करत प्रतिक्षाचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments