Newsworldmarathi Pimpri: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु), पिंपरी, पुणे येथे 16 वा पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या समारंभाला महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती मा. डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे च्या प्र-कुलगुरू मा. डॉ. स्मिता जाधव, आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश मुरलीधर भागवत यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (ऑनोरिस कौसा) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य, धैर्य, विनय, बांधिलकी आणि श्रद्धा या पाच मूलभूत मूल्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आम्ही विद्यापीठात विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न घडवतो.”
या समारंभात 12244 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 73 पीएच.डी., 10884 पदव्युत्तर, 1276 पदवी आणि 11 पदविका धारकांचा समावेश आहे. परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या 31 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील यशोगाथांचा आढावा घेण्यात आला.


Recent Comments