Newsworldmarathi Pimpri : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांनी सात दिवस पोलिसांना गुंगारा दिला. त्यांना अटक केल्यानंतर आरोपी हगवणे यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, अधिक तपासात त्यांना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी कर्नाटकच्या माजी ऊर्जामंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक केली आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (वय-४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे नाव आहे. यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव यांनादेखील अटक करण्यात आली आहे. प्रीतम याचे वडील वीरकुमार पाटील यांनी काँग्रेसमधून सलग २८ वर्षे आमदार होते. त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता.
पोलिसांच्या तपासानुसार, या आरोपींनी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विविध ठिकाणी लपवले, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली आणि आर्थिक मदत पुरवली. विशेषतः, कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे.
पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, वैष्णवी हगवणेच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या असून त्यातील १५ ताज्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीच्या पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेसाठी तपास सुरू ठेवला आहे. विशेषतः, निलेश चव्हाण या आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Recent Comments