Newsworldmarathi Beed: बीडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पूल येथे अंगावर शहारे आणणारा अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरवर चढली, अन जीव वाचवत सगळे खाली उतरताच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चिरडून जागीच सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बीडमधील गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर मध्यरात्री घडली आहे. या अपघातातील सहा जणांच्या मृत्यूने गेवराई गावावर शोककळा पसरली आहे.
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसेच एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरला धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. म्हणजे असे म्हणता येईल, काळ आला होता,पण वेळ आली नव्हती. मात्र, त्यानंतर दुसऱ्यांदा पाठीमागून वेगाने ट्रक आली, तिने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. आणि संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला.
दरम्यान, धडक इतकी जोरदार होती कि, त्यामध्ये एकाच वेळी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी सहाजण दूरवर फेकले गेले. सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते. अपघात झाल्यानंतर संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले पण त्यानंतर मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. या अपघातामध्ये सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.


Recent Comments