Newsworldmarathi Pimpri: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आधीच चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांवर आता आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. वैष्णवीच्या पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
प्रशांत येळवंडे (रा. निगोजे, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२२ मध्ये त्यांनी शशांक आणि लता हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदीचा व्यवहार केला होता. पाच लाख रुपये रोख दिल्यानंतर उर्वरित कर्जासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांनी हप्त्यांद्वारे ६.७० लाख रुपये भरले; मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते न भरता रक्कम स्वतःसाठी वापरली आणि बँकेने जेसीबी जप्त केला. नंतर मशीन परत मिळावी म्हणून पाठपुरावा करत असताना शशांकने पिस्तूल दाखवून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारामुळे पोलिसांनी फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. यासोबतच वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील तपासही वेग घेत आहे. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी झाली. त्यांच्यावर वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना देखील पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, मेसेजेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आरोपी शशांक व त्याच्या कुटुंबीयांवर आता विविध गंभीर कलमान्वये कारवाई होत असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते करत आहेत. या प्रकारामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणी आणखी गहण झाल्या आहेत.


Recent Comments