Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यातील तीन केंद्रांची स्थापना महाराष्ट्रात केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्रा आणि सोलापुरात डाळिंब या पिकांसाठी खास स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारली जातील. यासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निरीक्षण केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी जाणवत असल्याचे लक्षात आले असून, रोगमुक्त रोपांची अनुपलब्धता ही मोठी समस्या असल्याचे चौहान यांनी नमूद केले. त्यामुळे उत्पन्नात घट आणि उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
या नव्या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च दर्जाची व रोगविरहित रोपे सहज उपलब्ध होतील. यामुळे शेतीत उत्पादनवाढीसोबतच आर्थिक स्थैर्यही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments