Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांमुळे आणि विविध विभागांकडून रस्त्यांची खोदाई करून करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना अवकाळी पावसात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आगामी पावसाळ्यात तरी खड्ड्यांपासून सुटका होईल का, हा प्रश्न शहरवासीयांना सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावीत. तसेच ज्या ठेकेदारांनी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरणाची कामे पूर्ण केली आहेत, त्यांना पावसाळ्यानंतरच बिलांचे देय दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने सेवावाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदण्यास परवानगी दिली होती. यासाठी ३१ मेपर्यंत काम पूर्ण करून डांबरीकरण करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, अनेक विभागांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली पथ, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला असून, कामांची गुणवत्ता राखत वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांची सुधारणा होऊन पुणेकरांना येत्या पावसाळ्यात दिलासा मिळावा, हा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.


Recent Comments