Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आंदोलनाच्या मार्गावर जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुणे महापालिकेला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत की, “नवसमाविष्ट गावांना तातडीने आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा.”
सन 2018 मध्ये पुणे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी २४×७ पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. मात्र, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागांतील नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत.
विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “लक्षवेधी सूचना” मार्फत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यासंदर्भात विधानभवनातील सभापती प्रा. शिंदे यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा संदर्भातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला आमदार योगेश टिळेकर यांच्यासह विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका छापवाले उपस्थित होत्या.
सभापती शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सद्यस्थितीत पुणे महापालिकेस १४ टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. मात्र, नव्या ३४ गावांसाठी पाणीपुरवठा करताना हा साठा अपुरा पडतो. त्यामुळे नवीन २१ टीएमसी पाणी देण्याचा करार तातडीने करण्यात यावा.”
योजना सुरू होऊन तब्बल सहा वर्षे झाली असली तरीही पाणीपुरवठा अपुरा असल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रा. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ, वेळेचे नियोजन करून आणि व्यापक आराखडा तयार करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.


Recent Comments