Newsworldmarathi Jalana : जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खरीप हंगामाच्या तयारीने शेतात राबणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. शेतात मशागतीचं काम करत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बाप आणि त्याच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
विनोद मस्के (वय – ४०) हे आपल्या शेतात खरीप हंगामासाठी मशागत करत होते. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा हे दोघे लहान बाळंतही होते. अचानकपणे शेतातील विद्युत तार मस्केंच्या संपर्कात आली आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या समर्थ आणि श्रद्धालाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि तिघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रसंगाने परिसर हादरून गेला आहे. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सध्या तिन्ही मृतदेह जालना सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मस्के कुटुंबावर एकाच वेळी एवढं मोठं संकट कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबाचा असा अकाली अंत झाल्याने कृषिप्रधान ग्रामीण जीवनातील धोक्यांची गंभीरतेने दखल घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


Recent Comments