Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांवर मनपाने कडक कारवाई केली आहे. सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आणि महिला अधिकाऱ्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही महापालिका आयुक्तांनी मनपाच्या आवारात प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या पत्रकार कक्षात परवानगी न घेता पत्रकार परिषद घेणं, मोठा जमाव जमवून महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात गोंधळ घालणं आणि सोशल मीडियावर “कपडे काढण्याची” अश्लील आणि धमकीची भाषा वापरणं या सर्व प्रकारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
व्हिडीओ व्हायरल, धमकीची भाषा उघड
ओंकार कदमच्या महिला सहकाऱ्यांनी आणि महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी फेसबुक लाईव्हद्वारे महिला अधिकाऱ्याला जाहीरपणे धमकावलं. यामध्ये “कपडे काढून टाकू” अशी अश्लील भाषा वापरण्यात आली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने गंभीर दखल घेतली.
या ६ जणांना मनपात प्रवेशबंदी
महापालिकेच्या कारवाईत विशाल जाधव, रेखा ससाणे, संगीता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड आणि मीना धोत्रे या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यावर प्रवेशबंदी
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याचा सहकारी अक्षय कांबळे यांच्यावर महापालिका भवन व अन्य कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. या प्रकरणात महिला अधिकाऱ्याने लैंगिक छळविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती.
महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून गंभीर शिफारशी केल्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी ही कठोर कारवाई केली. हे प्रकरण आता अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि सार्वजनिक प्रशासनातील शिस्तीचा गंभीर मुद्दा बनले आहे.


Recent Comments