Newsworldmarathi Pune : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि स्कूटरमध्ये झालेल्या धडकेत एक महिलेला जीव गमवावा लागला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रक (MH 14 AS 8852) चालकाने भरदिवसा स्कूटरला जोरदार धडक दिली. स्कूटरवर दोघं प्रवास करत होते. या धडकेत दिपाली युवराज सोनी (वय 29) यांचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्पायरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51, रा. भवानी पेठ, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर BNSS कलम 105 आणि आयपीसी 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातानंतर काही वेळ गंगाधाम चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.


Recent Comments