Newsworldmarathi Pune : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठा निर्णय घेण्यात आले. दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची योजना आखण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपंचालक यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची देखील पोलीस पडताळणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिले यावेळी दिले आहेत.
414 स्कूल बस व 208 इतर वाहने आढळली दोषी
शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान 1 हजार 321 स्कूल बस तसेच 650 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 414 स्कूल बस व 208 इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल 55 कोटी 23लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
काय आहेत नियमावली?
शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी. यासाठी प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे
शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी.
बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा.स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी.
नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा.


Recent Comments