Newsworldmarathi Pune: गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून पुणे शहरात विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार ते अती मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने याबाबत आधीच अंदाज वर्तवला होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे झपाट्याने आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहराची झोप उडाली.
पावसाच्या भीषण तडाख्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला, परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर इतका होता की काही वेळेस दूरवर काहीच दिसत नव्हतं. नोकरीवरून घरी परतणारे नागरिक पावसात अडकले. काही जणांना मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावरच थांबावे लागले.
गुरुवारी रात्री दहा वाजता हलक्या सरींनी सुरुवात झाली. पंधरा मिनिटात पाऊस थांबल्याने अनेकांनी घरी जाण्यास सुरुवात केली. पण अवघ्या दहा मिनिटातच आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि पावसाने रौद्ररूप धारण केले. शहरातील पेठांपासून उपनगरांपर्यंत या पावसाचा मोठा प्रभाव जाणवला.
आगामी तीन दिवस पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाने १३ ते १६ जूनदरम्यान पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुणे शहर व परिसरात विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांसाठी सूचना :
• घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत बाळगावा
• विजांच्या कडकडाटात झाडाखाली उभे राहू नये
• मोबाईलवर बोलणे टाळावे
• मोकळ्या जागांपासून दूर राहावे
• सखल भागात जाण्याचे टाळावे
हवामान खात्याच्या सूचनेनुसार नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Recent Comments