Newsworldmarathi Pune : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होत असून, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलिस ठाण्याने यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके असे जवळपास २ हजार मनुष्यबळ सोहळ्यासाठी मागविले आहे. आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी ही माहिती दिली.
सोमवारी हा बंदोबस्त दाखल होणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नागरिकांनी तत्काळ पोलिस मदतीसाठी ११२ नंबर डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्थान सोहळा कालावधीत दि. १७ ते २० यादरम्यान आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळे मंगळवार (दि. १७) पासून शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. स्थानिक तसेच भाविकांना आपली वाहने शहरात स्वत:च्या घरी नेता यावीत, यासाठी आळंदी देवस्थान व आळंदी पोलिस प्रशासनाने संयुक्त बैठक घेत स्थानिक नागरिकांना पास उपलब्ध करून दिले आहेत. पालखीचे प्रस्थान गुरुवारी (दि.१९) होणार असून, या दिवशी गुरुवार असल्याने माउली पालखीची सूर्यास्तानंतर नित्य गुरुवारची पालखी प्रदक्षिणा होत असते.
कडक पोलिस बंदोबस्त
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून ७ सहायक पोलिस आयुक्त, ४२ पोलिस निरीक्षक, १६४ पोलिस उपनिरीक्षक, १ हजार ३४० पोलिस अंमलदार,६०० होमगार्ड, असा बंदोबस्त नेमण्यात येणार असून, एसआरपीएफच्या २ कंपन्या, एनडीआरएफची एक तुकडी आणि बीडीडीएसची २ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत.


Recent Comments