Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील सण-उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांची मिरवणुकीत महत्वाची भूमिका असते. अशा पारंपरिक वाद्यांबाबत पुण्यातील पथकांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ढोल-ताशा वाजवण्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. भूतकाळात जर अशा प्रकारचे खटले दाखल झाले असतील, तर ते थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ढोल-ताशा महासंघाच्या बैठकीत शर्मा यांनी पथकांच्या सरावाच्या वेळेबाबतही मार्गदर्शन केले. रात्री १० नंतर ढोल-ताशांच्या सरावामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षात येतात. त्यामुळे, सर्व पथकांनी सराव वेळेआधी सुरू करून तो रात्री १० पूर्वीच संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पारंपरिक वाद्यांचा सन्मान राखत, सार्वजनिक शांततेचेही भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. या निर्णयामुळे पारंपरिक वाद्यप्रेमी आणि ढोल-ताशा पथकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments