Newsworld Nagpur : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“देवेंद्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याचं महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचं व्हिजन खूप मोठं आहे. त्याने मागील कार्यकाळात सुरू केलेल्या योजना आणि धोरणं पूर्ण करत तो राज्याचं नाव उंचावेल, याची मला खात्री आहे,” असं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस याचं व्हिजन महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्यावर त्यांचा भर असेल. पुढील पाच वर्षांत राज्याच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरू राहील. असं ही त्या म्हणाल्या.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवा गतीशील टप्पा गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेताना महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आणि राजकीय धडाडीचं कौतुक केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या संवादाचा आणि अनुभवाचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही दोघंही विधानसभेत एकाचवेळी होतो, त्यामुळे आमचं भेटणं, बोलणं रोजच व्हायचं. एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर आम्ही नेहमी संवाद साधत असू. देवेंद्र हा राजकारणामध्ये लोकांच्या भावना आणि परिस्थिती अचूक ओळखतो, त्यात त्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं.
राजकारणात टिकण्यासाठी धडाडी आणि आवड महत्त्वाची असते, ती गुणवैशिष्ट्यं देवेंद्रमध्ये आहेत. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ते नेहमी समस्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतात, ज्यामुळे ते जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतात.
शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचा आणि नेतृत्वाच्या वैशिष्ट्यांचा गौरव करत भरभरून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.