Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्याचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल नागनाथ काळे याला ‘बापल्योक’ या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण तीन पुरस्कार मिळाले. तर पणजी येथे झालेल्या १० व्या गोवा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विठ्ठल नागनाथ काळे याला ‘काजरो’ (द बिटर ट्री) या कोंकणी भाषेत असलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा विठ्ठल काळे हा पहिलाच अभिनेता ठरला आहे. कोंकणी भाषा येत नसतानाही त्या भाषेचा अभ्यास करून त्याने ही भूमिका साकारली आहे. काजरो या कोंकणी चित्रपटाला ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठलने बापल्योक, पुनःश्च हरिओम, लाईक आणि सब्स्क्राईब, घर बंदूक बिर्याणी, राक्षस, हॉटेल मुंबई या चित्रपटांमध्ये, तसेच मानवत मर्डर्स या वेबसीरीजमध्ये लक्षवेधी अभिनय केला आहे.
विठ्ठलने दोन्ही राज्य, निवड समिती, परीक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्माते यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पुरस्कारांमुळे माझ्यावर जबाबदारी आणखीन वाढली आहे, अशाच उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.


Recent Comments