Homeपुणेभारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह सीमावर्ती भागात करणार दगडूशेठ...

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह सीमावर्ती भागात करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

Newsworldmarathi Pune: सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होण्यास येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील ३३, ६, १९, १, १०१ इन्फन्ट्री आणि ७१ इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह येथे गणेशोत्सवात श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्यास देण्यात आल्या.

सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या सैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग १५ वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत.

सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सिमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील सैनिकांनी व्यक्त केली आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments